माझी लुना
आयुष्यातली पहिली गोष्ट शेवटपर्यंत साथ देते.
फिकट निळसर रंग असलेली माझी लुना ' पहिली गोष्ट' ह्या व्याख्येत बसणारी. अगदी प्रेमकथेसारखी सुरुवात. मी अकरावीत असताना पहिल्यांदा भेटली. आईला नको होती, चालवायची भीती वाटते म्हणुन. तर बाबांना भीती मी कशी चालविन ह्याची. शेवटी रितसर 'लर्नर'स लाईसेन्स काढून आणला, मग बाबा म्हणाले चल शिकवतो. आता मी तसा हड़कूळा, आणि बाबा ( तुम्ही पाहिलय का त्यांना त्यावेळी) मागे बसल्यावर काय. काहीच हालचाल नाही हो लुनाची. मग मामा आला. तो मागे बसला आणि मी अक्सेलेरेटर वाढ़वल्यावर गुपचुप उतरला. मी चालवतोय की छान.
खरतर, एक वर्षातच सूटायची लुना, पण निकाल लागला, बारावीचा . ८८% मध्ये COEP मिळेना. बाबा गरवारेच्या दारातच म्हणाले, नवी गाड़ी चार वर्षांनंतर. जाम राग आला होता, पण कुठेतरी पटत पण होतं.
VIT च्या चढावर दमायची ती. तशा तिच्या अनेक मजा होत्या. ४३ किमी वेग झाला की फाटफाट असा आवाज यायचा, मग बंद. त्यामुळे कसं निवांत जायचो आम्ही.
माझ्या लुनाला पाउस येणार असेल तर कळायचं. ओम्या म्हणायचा आकाशात ढग आले की ही बंद पड़ते.
मला आणि ओमला पहिली नोकरी एकाच ठिकाणी लागली , '९६ मध्ये. बाणेर रोड वर, सर्जा होटेल डावीकड़े सोडून सरळ गेल, की किलोमीटर वर. रोज सकाळी ओम्या त्याच्या हीरो होंडा CD100 SS वर आणि मी बाजूला लुनावर. ओम्या नागमोडी गाड़ी चालवत, कारण आम्ही बरोबर जावे म्हणुन.
एकदा रात्रि पाउस पडून सकाळी पाण्याची डबकी साठली होती. नेशनल सोसाइटी पार करून पुढे गेलो आणि नागमोडी जाउनही ओम्या पार पुढे. मी लुनावरून उतरून, स्टैंडवर घेउन निवांतपणे चालु करतोय. ओम्या परत येउन म्हणाला ' काय रे ?'. मला हसू अवरेना. ' अरे डबक्यातुन चालवायला कोणी सांगीतलय, पाणी उड़लना लुनावर'. काय हासलोय.
बाबांनी इंजीनियरिंग नंतर सांगितल्याप्रमाणे M-८० घेतली. आणि ही पहिली गोष्ट शेवटपर्यंत लक्षात रहाण्यासाठी निघून गेली.